शेवटच पान
माझी वही मागून नेहमीच भरायची
पण वर्ष संपल तरी
पहिल्या पानावर एक शब्दही दिसायचा नाही,
कारण शेवटच्या पानावर सुटणार गणित
आतल्या पानावर तासंतास सुटायचं नाही...
त्या कंटाळवाण्या तासाला
मागल्या पानावर चितारलेला
तो फुलांचा सोहळा, भ्रमरांची गुंगून
अन पक्षांची किलबिल आजही थांबली नाही...
पण जीवशास्त्राच्या परीक्षेत
गुदमरलेल्या त्या फुलांचा नि किड्यांचा,
त्या पक्षी नि प्राण्यांचा
आज एक अवशेष शोधूनही सापडणार नाही...
प्रेयसीला लिहिलेल्या प्रेमपत्राचं
व्याकरण कधी चुकुनही चुकल नाही...
सगळ्या मास्तरांनी माझ्यासमोर डोक फोडलं
पण शुद्धलेखनात माझी प्रगती
१० पैकी ४ च्या पुढे कधी सरकलीच नाही...
या कवीला कविता लिहायला
ती शेवटची पानं कधी पुरली नसतील
पण पुस्तकातल्या किचकट कवितांच्या
शब्दांचे अर्थ त्याला कधीच कळाले नाही...
असा शिकलो मी,
पुढची पानं वाचून डिग्री मिळाली
पण शिकण्यातली गंमत
त्यांना कधी सांगताच आली नाही...
शेवटच्या पानांनी डिग्री नसेल दिली
पण त्यांनी जगण्याची खरी गंमत शिकवली
आज शाळा सुटली असेल
पण त्यांची आजही साथ सुटली नाही!!!
- ऋषीकेश


Comments
Post a Comment