तो म्हणतो "काय मागितलं नि काय दिलस तू?"... पण


कायरे मागितलं होत मी तुला?
मागितल्या होत्या तुला
फक्त चार-सहा भिंती
अन त्यावर कौलारू छत...
छताआड लपलेले
चिमणा-चिमणीच्या पंखांची माया,
अन सुखदुखातही साथ न सोडणाऱ्या
साथीदाराच्या स्नेहाची छाया!
या छोट्याशा घरट्याबाहेर हवी होती
चौफेर पसरलेली हिरवीगार चादर,
अन त्या हिरव्यागार चादरीला
जाई-जुई, जास्वंद, मोगरा
अन इंद्रधनुच्या पटलातुन चोरलेल्या रंगानी
बहरलेला पुष्पराजाच कुंपण!!!
ऐकायची होती मला
या बगीच्यात भ्रमराची गुंगुं,
अन बघायची होती मला
माझ्या पिल्लाबरोबर स्वच्छंद बागडणाऱ्या
असंख्य फुलपाखरांची रंगांची उधळण!!!


पण सर्वांती काय दिलस तू मला?
भिंती उभ्या राहण्याआधीच पाडल्यास,
डोक्यावरच छत उडवलेस ,
अन चिमणा-चिमणीचे पंख
माया देण्याआधीच छाटलेस,
तेही कमी होत कदाचित
म्हणून माझ्या एकुलत्या एक हृदयालाही
भलेमोठे छिद्र पाडलेस!!!
जिथे हवी होती हिरवळ
आज तिथे रेतीचे पिवळे डोंगर उभारलेस,
अन जिथे हवी होती फुलं
तिथे दुखः कधी निसटू नये
म्हणून अगणित काट्यांच कुंपणही टाकलेस!
शेवटचा पर्याय म्हणून,
एखाद्या हृदयाच्या छोटाश्या कोपऱ्यात
शोधत होतो सुखांचा आसरा,
पण बंद करून सगळ्या हृदयांची कवाडं
उरल्यासुरल्या आयुष्याच गणितही
शून्य करून टाकलेस!!!


काय मागितलं नि काय दिलस तू...............???


पण तेवढ्यात तो कडाडला,
" मीही हेच मागितलं होत त्याला,
पण त्यानेही काहीच नव्हत दिलं मला!
अस्तित्वाच्या वार्ता करतोस
पण खरा 'शून्य' म्हणजे काय
मी सोडून माहितीतरी आहे कोणाला?
मीही तुझ्यासारखाच हताश होतो
स्वतःच अस्तित्वच गमावून बसलो होतो...
पण शेवटी तोच शून्य धावून आला माझ्या मदतीला,
अन तेव्हाच झाला खरा प्रारंभ या ब्रम्हांड निर्मितीला!


सर्वप्रथम त्याने माझ आत्मज्ञान जागवल,
तेव्हा कुठे मला
माझ्या अस्तित्वच सत्य समजल,
मग आकड्यांच ज्ञान देत
कधी उजव्या कधी डाव्या बाजूला बसून
त्याने माझ्या सृष्टीच सृजनसूत्र जुळवल!
मग पडली एक ठिणगी
अन माझ विश्व सूत्रातून भौतिकतेत उतरलं,
काळानी चक्र फिरवली,
अन माझं स्वप्नातलं घर
त्या असीम लख्ख तेजानी पेटलं!!!


त्यानंतर युगानमागे युगे उलटली
पण मलाही मायेचे पंख भेटले नाहीत,
हे अफाट ब्रम्हांड रचूनही
मलाही माझा सुखदुखाचा साथीदार,
कधी जर झालो पुन्हा हताश
तर पुन्हा बाहुंमध्ये बळ भरणारा
आधार मिळाला नाही,
मग वाटल,
कुठतरी स्वतःच असावं अढळ अस्तित्व
म्हणून या निर्जीवसृष्टीत मी जीवन फुलवल,
कुणीतरी धडकत राहावं माझ्यासाठी निरंतर
म्हणून एक दिवस,
तुझ हे छानस हृदय बनवलं!!!


असा मी तुझा देव,
कधीकाळी तुझ्यासारखाच सर्वसामान्य होतो,
पण आज मी झालोय कल्पतरू,
मी माझ प्रत्येक सुख माझ्या अंगणात फुलवतो!!!
आज तुही माझ्यासारखा शून्यात आहेस,
मिळाल असेल अपयश छोटास,
एवढ्या लवकर धीर सोडू नकोस,
ठेव स्वतःवर थोडीशी श्रद्धा,
कारण तू हृदयात बांधलेलं तुझ विश्व
फक्त एका महास्फोटाची वाट बघत आहे!!! "


-ऋषीकेश 





Comments