तिच्या डोळ्यातलं रहस्य!!!
मला तिच्या डोळ्यातलं ते गूढ कधी उलगडता आलंच नाही...कित्येकदा बांध घालायचा प्रयत्न केला होता मी
पण तिच्या डोळ्यातून वाहणार पाणी कधी अडवताच आल नाही...
मला आठवत, एरवी लुटुपुटूच्या आमच्या लढायांमध्ये
अगणित चिमटे काढूनही न रडणाऱ्या तिला
जेव्हा मी पहिला स्पर्श केला होता
तेव्हा त्या शहारलेल्या पापण्यांमध्ये अडकलेला तो छोटासा थेंब
हळूहळू लहानाचा मोठा होत गालांवर उतरला होता...
सुखदुखांची साथ काय असते तिच्या थेंबानी शिकवलं मला...
स्वतःच्या सुखांमध्ये मला स्वतःच सुख देणारी
मात्र दुःखांना हसत हसत गिळून घेणारी ती
माझ्या छोट्याशा यशाने इतकी फुलून जायची कि
वेडी आनंदाच्याभरात रडायला लागायची...
अन कोसळलं जर आभाळ माझ्यावर तर ती हळव्या मनाची
भक्कम होऊन मला स्वतःच्या उबदार मिठीत लपवून घ्यायची...
पण नाजूक मन किती वेळ आवरणार स्वतःला?
घटकाभाराने नकळत हुंदका देऊन मलाही भिजवून टाकायची...
त्या थेंबांनी उघड्या डोळ्याने स्वप्नही दाखवली मला...
कधी बागेत गेलो कि,
स्वतःच सर्वस्व माझ्या कुशीत झोकून द्यायची,
तिचं शील माझ व्हायचं पण तरी
तिची नजर बागेत चहूकडे भिरभिरत असायची,
नजरेत प्रत्येक छोटीछोटी गोष्ट टिपत
ती नजरेनेच आमच छोटास विश्व बनवायची-सजवायची!!!
तिने स्वतःच्या हृदयात बांधलेलं विश्व जाणण्यासाठी
मला कधी तिच्या शब्दांची गरजच भासली नाही,
तिच्या अबोल-निशब्द लुकलुकणाऱ्या पापण्यामधेच माझी सैर होऊन जायची....
त्यात जर एखाद चिमुकल फुलपाखरू
समोर उभ राहून पायातलं पैंजण थुइथुइ नाचवायला लागल कि
आधीच स्वप्नांनी गर्दी केलेल्या त्या नजरेत
या फुलपाखराच्या रंगात रंगलेली नजर माझ्या नजरेला तासंतास भिडायची,
मग त्या स्वप्नात स्वतःही जगायची अन मलाही जगवायची,
अन या स्वप्नांच्या महापुरात,
उर दाटून आला कि सुखांचे लक्षावधी थेंब बनून धो-धो बरसायची...
असे तिच्या डोळ्यातले अश्रू
त्यांना प्रेमातल्या प्रत्येक सोहळ्यात वाहण्यासाठी वाट सापडायची,
देवजाणे,
हा अश्रूंचा महासागर ती इवल्याश्या डोळ्यांमध्ये कुठे दडवायची...
पण मी तर फक्त त्या रहस्याच्या शोधात होतो अन सुटतही आल होत ते,
पण त्यादिवशी,
वाटल नव्हत तिच्या गालांवर उतरला तो थेंब शेवटचा असेल,
टिपायला धावलो होतो तसा, पण त्याआधीच तिने
सारी शपथां-वचनांची बंधन तोडून डोळ्यांची कवाडं कायमचीच ओढून घेतली...
जाताजाता मागे तो अश्रूंचा अथांग महासागर
माझ्या डोळ्यात स्वतःची शेवटची आठवण म्हणून ठेऊन गेली...
रहस्य तर सुटलच नाही,
पण तिच्याशिवाय जगणाऱ्या या निराधार जीवाला स्वतःचा रोग लावून गेली!!!
- ऋषीकेश

Comments
Post a Comment